गुंतवणुकीचा ‘स्मार्ट’ ( Smart ) फॉर्म्युला ( Formula )

उल्हास हरी जोशी

सगळ्याच गुंतवणूक दारांना आपली गुंतवणूक यशस्वी व्हावी असे वाटत असते. पण आपली गुंतवणूक यशस्वी झाली किंवा नाही हे ठरविण्याचे एकच साधन त्यांच्या हातामधे असते. ते म्हणजे गुंतवणुकीवर होणारा फायदा किंवा नुकसान! जर गुंतवणुकीवर परतावा मिळत असेल, फायदा होत असेल तर गुंतवणूक यशस्वी झाली असे समजण्यात येते. जर गुंतवणुकीवर परतावा मिळत नसेल, फायदा होत नसेल किंवा नुकसान होत असेल तर गुंतवणूक यशस्वी झाली नाही असे मानण्यात येते. अर्थात यात चुकीचे किंवा वावगे असे काहीच नाही.

सर्वसाधारणपणे येणार्‍या उत्पन्नातून खर्च होणारा पैसा वजा जाता जो पैसा उरतो त्यातून गुंतवणुकीचा विचार करण्याची पध्धत आहे. तसेच शिल्लक राहणारा सगळाच पैसा गुंतवणुकीसाठी वापरला जातोच असे नाही. बर्‍याचवेळा हा पैसा किंवा यातील काही पैसा इमर्जन्सी ( Emergency ) साठी म्हणून राखून ठेवला जातो किंवा नुसताच पाडून ठेवला जातो. अशा पद्धतीने केलेली गुंतवणूक प्रत्यक्षात किती फायदेशीर, लाभदायक, उपयोगाची किंवा ‘अर्थपूर्ण’ होते हा एक मोठा प्रश्नच आहे!

गुंतवणुकीचा मुख्य उद्देश पैसा उभा करणे हा असतो. हा पैसा बचत, बचतीची गुंतवणूक आणि गुंतवणुकीवर मिळणारा परतावा किंवा फायदा या माध्यमातून उभा करायचा असतो. Assets म्हणजे संपत्ती विकून किंवा कर्ज काढुन हा पैसा उभा करायचा नसतो.पण पुष्कळ वेळा किती पैसा उभा करायचा, किती वेळात उभा करायचा आणि कशासाठी उभा करायचा हेच ठरलेले नसते. थोडक्यात गुंतवणुकीला कांही उद्दिष्ट, ध्येय, टार्गेट ( Target ) किंवा गोल ( Goal ) नसतो. जर गुंतवणुकीला उद्दिष्टाची जोड दिली तर गुंतवणूक किती प्रमाणात यशस्वी झाली आहे हे पाहण्याचे अजून एक ठोस साधन गुंतवणूक दाराला मिळू शकेल.

उद्दिष्ट ठरविण्याचा एक ‘स्मार्ट’ ( Smart ) फॉर्म्युला ( Formula ) आहे तो खालील प्रमाणे

S – Specific – ठरवलेले
Simple – साधे, सरळ, सोपे
Systematic – पध्धतशीर पणे ठरविलेले
M – Measurable – मोज, माप करण्याजोगे
A – Actionable – ‘ आक्शन’ (Action) घेता येण्याजोगे
Achievable – पूर्ण करता येण्यासारखे
R – Repeatable – ‘रिपीट’ करता येण्यासारखे
Recurring – वाढत जाणारे, जमा होत जाणारे
T – Time Bound – वेळेचे बंधन असणारे
आता गुंतवणुकीसाठी या ‘स्मार्ट’ ( Smart ) फोर्मुल्याचा कसा उपयोग करता येतो ते बघू .

१) S – Specific, Simple, Systematic :-
आपले उद्दिष्ट हे ठरवलेले ( Specific ) असले पाहिजे. ते साधे, सरळ, सोपे ( Simple ) असले पाहिजे. तसेच ते पध्धतशीर पणे ( Systematic ) ठरवलेले असले पाहिजे.

गुंतवणुकिचे उद्दिष्ट म्हणजे पैसे उभे करायचे उद्दिष्ट! हे उद्दिष्ट ठरविण्यापूर्वी आपल्या आर्थिक गरजा काय असणार आहेत याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपल्या आर्थिक गरजांचे खालील प्रमाणे वर्गीकरण करता येणे शक्य आहे.
Immediate – लगेचच्या – आजपासून एक वर्षाच्या आतील आर्थिक गरजा.
Short Term – अल्प कालीन – एक वर्ष ते तीन वर्षांमधील आर्थिक गरजा.
Mid Term – मध्य कालीन – तीन वर्षे ते ५ वर्षांमधील आर्थिक गरजा.
Long Term – दीर्घ कालीन – ५ वर्षे ते ३० वर्षे या काळातील आर्थिक गरजा.
या आर्थिक गरजांचा विचार करताना नेहमीच्या ठराविक खर्चांच्या व्यतिरिक्त अजून कोण कोणत्या कारणांसाठी पैसा लागू शकणार आहे याचा सखोल विचार करावा. यामध्ये गृहकर्ज किंवा गाडीसाठी कर्ज घ्यायचे असल्यास त्यासाठी लागणारा ‘मर्जीन मनी’ उभा करणे, कर्जे घेतली असल्यास त्याची परतफेड करणे, मुलाबाळांचे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण, मुलींची लग्ने, निवृत्तीनंतर लागणाऱ्या पेन्शनसाठी पुरेसा पेन्शन फंड उभा करणे, वैद्यकीय खर्च, फॉरीन ( Foreign ) ट्रिप्स ( Trips ), संपत्ती निर्माण करण्यासाठी लागणारी गुंतवणूक, इतर मोठे खर्च याचा विचार करावा. या खर्चाचे आकडे काढताना महागाई वाढीचा ( Inflation ) विचार करावा. या ठिकाणी योग्य आणि अनुभवी अशा तज्ञाची मदत घेण्यामध्ये संकोच करू नये.
एखाद्याच्या आर्थिक गरजा खालील प्रमाणे येऊ शकतात.
Immediate – लगेचच – १ लाख रुपये
Short Term – अल्पकालीन – ४लख रुपये
Mid Term – मध्य कालीन – ८ लाख रुपये
Long Term -दीर्घ कालीन – ८७ लाख रुपये
एकुण १ कोटी रुपये
त्याचे पैसे उभे करण्याचे उद्दिष्ट हे वरील प्रमाणे ठरविता येणे शक्य आहे.
गुंतवणुकीवरील परात्यावाचे उद्दिष्ट पण ठरविणे आवश्यक आहे. महागाईवर मात करण्याचे उद्दिष्ट ठरवले तर तर महागाई वाढीच्या दरापेक्षा ( Rate of Inflation ) जास्त दराने परतावा मिळणे आवश्यक आहे. भारतामध्ये महागाई वाढीचा दर सर्वसाधारणपणे वर्षाला ६ % आहे. तसेच महागाई ही चक्रवाढ पद्धतीने ( Compounding ) वाढत असते. त्यामुळे वर्षाला १० % प्रमाणे चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळविण्याचे उद्दिष्ट योग्य ठरेल.

२) M – Measurable :-

आपले उद्दिष्ट असे असावे कि ज्याचे मोज माप करणे शक्य व्हावे. ज्या उद्दिष्टाचे मोज माप करणे शक्य नसते अशी उद्दिष्टे ठेवू नयेत. उदाहरणार्थ ‘ मला भरपूर श्रीमंत व्हायचे आहे. मला चिक्कार पैसा मिळवायचा आहे. मला तुफान प्रगती करायची आहे’ या वाक्यांमधील ‘भरपूर,चीक्कार, तुफान’ या शब्दांना कांही मोज माप नसते.

किती पैसे उभे करायचे आणि किती काळात उभे करायचे हे एकदा ठरले कि त्यासाठी किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे हे ठरविता येते. दर वर्षी १० % चक्रवाढ पद्धतीने परतावा मिळत असेल तर १ लाख रुपये उभे करण्यासाठी सर्वसाधारणपणे किती गुंतवणूक करणे आवश्यक आहे याचे कोष्टक खाली दिले आहे.

मुदत वर्षांमध्ये वार्षिक गुंतवणूक मासिक गुंतवणूक

१ ९०९०० ७५७५
३ २७५०० २२९०
५ १४८९० १२४०
७ ९६०० ८००
१० ५७०० ४७५
१५ २९०० २४०
२० १६०० १३२
२५ ९२४ ७७
३० ५५० ४६

या प्रमाणे प्रत्यक्षात गुंतवणूक होते आहे किंवा नाही हे तपासून बघता येते. त्याचप्रमाणे आपल्या गुंतवणुकीवर अपेक्षित फायदा होतो आहे किंवा नाही हे पण तपासून बघता येते.

३) A – Actionable , Achievable:-

या ठिकाणी गुंतवणूक करणे ही Action घेणे आवश्यक आहे. ही Action जर घेतली नाही तर कांही फायदा नाही. तसेच पैसे उभे करण्याचे जे उद्दिष्ट आपण ठरविणार आहोत त्यासाठी लागणारी गुंतवणूक आपण करू शकतो का याचा पण अंदाज बांधणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इतर अनावश्यक खर्च टाळून आवश्यक ती गुंतवणूक करणे कसे शक्य होऊ शकते याचा पण विचार करता येऊ शकतो.

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा प्रत्यक्षात मिळतो आहे किंवा नाही हे पण ठराविक काळाने तपासून बघणे आवश्यक असते. जर एखाद्या योजनेमध्ये फायदा होत नसेल तर वेळीच त्या योजनेतील पैसे काढून घेऊन दुसर्‍या योजनेमध्ये गुंतविणे फायदेशीर ठरते.

गुंतवणुकीवर जो परतावा मिळतो तो खरोखरच तेवढा मिळू शकतो का ( Achievable ) हे पण तपासून बघणे आवश्यक असते. कारण हल्ली अव्वाच्या सव्वा परताव्याचे आमिष दाखविणार्‍या योजनांचे जणू कांही पेव फुटले आहे. जास्त व्याजाच्या मोहाला बळी पडून अनेक जण यात मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतविताना दिसत आहेत. पण अशा प्रकारच्या योजनांन मध्ये फसवणूक मोठ्या प्रमाणावर होत असते हे वर्तमानपत्रातून प्रसिध्ध होणार्‍या बातम्यांवरून दिसून आले आहे. त्यामुळे जास्त व्याजदराच्या मोहात न पडता Reasonable किंवा Achievable परतावा देणार्‍या योजनांचाच विचार करावा. साधारणपणे वर्षाला ८% ते १५ % परतावा मिळू शकतो असे आढळून आले आहे. या पेक्षा जास्त परतावा मिळाला तर ती देवाची कृपा समजावी.

४) R – Repeatable , Recurring :-

आपले उद्दिष्ट असे असावे की ते पूर्ण करण्यासाठी ज्या Action घ्याव्या लागतात त्या ‘रिपीट’ करण्याजोग्या असाव्यात. तसेच या Actions चा परिणाम हा एकमेकास पूरक, वाढत जाणारा किंवा जमा होत जाणारा असावा.

गुंतवणूक हा one time job नसून ती सतत चालणारी प्रक्रिया आहे हे प्रत्येक गुंतवणूक दराने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. एकदाच केलेल्या गुंतवणुकीपेक्षा सतत, नियमितपणे केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते असे आढळून आले आहे. Warren Buffet यांच्या मते मृत्युपर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. त्यामुळे गुंतवणुकीचा हा Job सतत ‘रिपीट’ करीत जावा.
‘सगळी अंडी एकाच टोपलीत ठेऊ नयेत’ अशी एक म्हण आहे. कारण ती टोपली पडली तर सगळीच किंवा जास्तीत जास्त अंडी फुटून मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. गुंतवणुकीला सुध्धा हा नियम लागू आहे. एकाच योजनेत सगळे पैसे न गुंतवता ते निरनिराळ्या योजनांमध्ये पैसे गुंतवणे जास्त फायदेशीर आणि सुरक्षित ठरते. गुंतवणुकीच्या निरनिराळ्या योजनांचे खालील प्रमाणे वर्गीकरण करता येते.
सरळ व्याज देणार्‍या ( Simple Interest ) योजना :-
या मध्ये बँक Deposits , पोस्टाच्या योजना, कंपनी Deposits , कंपन्यांचे कर्ज रोखे ( Debentures ) यांचा समावेश होतो.
आभासी फायदा देणारी गुंतवणूक :-
या मध्ये सोने ,चांदी ,दागदागिने , घर-दार, जमीन, प्लॉट, Property , रिअल Estate , शेअर मार्केट यातील गुंतवणुकीचा समावेश होतो. यातील फायदा किंवा नुकसान हे त्या वस्तूंच्या किमतीमधील चढ – उतारशी निगडीत असतो. तसेच प्रत्यक्षात त्या वस्तूची विक्री केल्याशिवाय अपेक्षित फायदा मिळत नाही.
चक्रवाढ व्याज किंवा परतावा देणार्‍या ( Compound Interest or returns ) योजना :-
या मध्ये PF ( Provident Fund ), PPF ( Public Provident fund ), म्युचुअल फंड आणि युलिप ( Unit Linked Insurance Plans ) या योजनांचा समावेश आहे.
आयकर वाचविण्याच्या योजना :-
आयकराच्या सेक्शन 80 C तसेच 80 D या अंतर्गत येणार्‍या योजना.
तसेच कांही जणांना बिझिनेस मध्ये गुंतवणूक करण्याची सवय असते. प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीला काही ना कांहीतरी जोखीम किंवा रिस्क असते. याचा विचार करून गुंतवणूक करणे केव्हाही श्रेयस्कर असते. या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीतून मिळणार्‍या फायद्याची गोळाबेरीज आपल्याला अपेक्षित असलेल्या फायद्या एवढी होते आहे किंवा नाही हे तपासून बघता येते. निरनिराळ्या गुंतवणुकीच्या योजनांना Portfolio असे म्हणतात. तसेच या गुंतवणुका हाताळण्याच्या प्रक्रियेला ‘ Portfolio Management ‘ म्हणतात. पूर्वी हे शब्द काही ठराविक लोकच, विशेषतः शेअर बाजाराशी संबंधित असलेले लोक वापरायचे. पण आता हे शब्द सर्वसाधारण गुंतवणूक दारांपर्यंत पोचले आहेत. या ठिकाणी योग्य,अनुभवी आणि प्रामाणिक तज्ञाची मदत नक्कीच उपयोगी पडू शकते.
५) T – Time Bound :-
आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, तसेच ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने ज्या Actions घ्यायच्या आहेत त्याला वेळेचे बंधन असणे आवश्यक आहे. समजा एखाद्याला १० वर्षात १० लाख रुपये उभे करायचे आहेत. तर पहिल्या वर्षत १ लाख, २ वर्षात २लाख असे पैसे उभारण्याचे लक्ष्य तो ठेवू शकतो.

आता गुंतवणूकदारांनी नुसतेच गुंतवणूकदार न बनता ‘स्मार्ट’ गुंतवणूकदार ( Smart Investor ) बनणे आवश्यक आहे. वरील गुंतवणुकीचा स्मार्ट फॉर्म्युला या साठी नक्कीच उपयोगी पडेल याची खात्री वाटते. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ‘स्मार्ट’ गुंतवणूकदार होण्याचा प्रयत्न करावा हीच सदिच्छा!
= उल्हास हरी जोशी

Share This Post

Post Comment