सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१८ ) – मितेश ताके
ट्रेडिंग संदर्भात काही गोष्टी/ मुद्दे अनेक पुस्तके, लेख, व्याख्याने, चर्चासत्र, इ. मधून परत परत ठासून सांगितले जात असतात. यांना “गोल्डन रुल्स” म्हणतात. याचा सरळ अर्थ असा आहे की या गोष्टी पाळाव्याच लागणार त्याशिवाय यश मिळणार नाही.
ट्रेडिंग डायरी /जर्नल /रोजनिशी लिहिणे हे त्यापैकीच एक !
एक चांगली डायरी घेऊन त्यात प्रत्येक ट्रेडची जास्तीत जास्त तपशीलवार माहिती लिहायची – तो ट्रेड का घेतला ? तो घेण्यामागे काय विचार होता ? त्यासाठी काय अभ्यास केला होता ? टेक्निकल / फंडामेंटल कारणे होती का ? तो घेताना टार्गेट व स्टॉपलॉस ठरवले होते का ? तो ट्रेड घेताना मनस्थिती कशी होती ? ट्रेड किती वाजता घेतला ? ट्रेडिंग चालू असताना मार्केटमध्ये काय काय घटना घडल्या ? त्या वेळी डोक्यात काय विचार येत होते ? ट्रेड केव्हा आणि कसा संपला ? नफा झाला की तोटा ? किती आणि का ? ट्रेड घेताना सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे केल्या का ? शिस्त पाळली का ? यात चांगल्या गोष्टी काय घडल्या ? कोणत्या चुका केल्या ? यातून काय शिकलात ? इ.इ.
काही ट्रेडर तर ट्रेडिंग केलेल्या चार्टची प्रिंटआउट घेऊन डायरीत चिकटवतात.
याचा फायदा काय ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर मी अनुभवाने सांगतो फायदेच फायदे आहेत !
ही डायरी म्हणजे तुमचा एक प्रकारचा इ सी जी रिपोर्टच !
अनेक ट्रेडिंगचे रेकॉर्ड तयार झाले की त्याचा अभ्यास करायचा – नेमके केव्हा केव्हा आपल्याला नफा होतो? या सगळ्यात काही समानता आहे का? या समानता समजल्यावर नेमके तेव्हाच किंवा तश्याच परिस्थिती मध्ये ट्रेड घ्यायचे हे आपल्याला समजते. तसेच तोटा केव्हा केव्हा आणि कशा परिस्थितीत होतो ? त्यातील समानता शोधायची आणि मग तशी शक्यता / परिस्थिती असेल तर ट्रेडिंग टाळायचे. यातून आपले पक्के आणि कच्चे दुवे सापडतात . ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या अधिक धारदार करून नफा वाढवता येतो तर ज्या कच्च्या गोष्टी आहेत त्यात सुधारणा करून किंवा टाळून तोटा कमी करता येतो.
आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो – मी निफ्टी ऑप्शनमध्ये डे ट्रेडिंग करतो. सुरवात पेपर ट्रेडिंगने केली होती. तेव्हापासून असे रेकॉर्ड ठेवले आहे. या सगळ्याचा अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की स्टॉपलॉस प्रत्यक्ष न लावता वेळ आल्यावर लावू असे ठरवतो आणि वेळ आली की लावत नाही त्यामुळे खूप नुकसान होत होते. आता लगेच कार्यवाही करतो.
तसेच लक्षात आले की शक्यतो सोमवारी तोटा होतो, आता मी सोमवारी खरे ट्रेडिंग करत नाही. पेपर ट्रेडिंग करतो. असे बरेच पॅटर्न सापडले त्यानुसार सुधारणा केल्या आहेत आणि करत राहणार.
असेच तुमचे एक एक पॅटर्न तूम्हाला सापडतील आणि मग त्यानुसार सतत सुधारणा करत रहायची आणि प्रगल्भ ट्रेडर बनायचे.
मित्रांनो, जर ट्रेडिंग डायरी लिहीत असाल तर अभिनंदन! नसाल तर त्वरित डायरी लिखाण चालू करा, फायदेच फायदे आहेत ! शुभेच्छा !!
—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-
Advertisements
Report this ad
Report this ad
Posted on जुलै 8, 2016
Leave a comment