डाऊ थेअरी

तांत्रिक विश्लेषण (TECHNICAL ANALYSIS)
डाऊ थेअरी

शेअर्सच्या खरेदी –विक्री बाबत निर्णय घेण्याचे एक उपयुक्त साधन म्हणजे तांत्रिक विश्लेषण (टेक्निकल एनालीसीस). मुलभूत विश्लेषणाचा केंद्रबिंदू कंपनीची कामगिरी हा असतो, तर तांत्रिक विश्लेषणाचा भर मार्केटचा रोख आणि शेअर्सचा भाव यावर असतो.
सिक्युरिट एनालिसिस या शास्त्राचे जनक बेंजामिन ग्रेहम मानले जातात. त्याचप्रमाणे तांत्रिक विश्लेषणाचे जनक चार्ल्स डाऊ हे समजले जातात.
डाऊ यांनी ‘डाऊ-जोन्स फायनान्शियल न्यूज सर्व्हिस’ या संस्थेची स्थापना केली. याशिवाय ‘निर्देशांक’ या संकल्पनेला जन्म दिला. १८९७ मध्ये अस्तित्वात आणलेला डाऊ – जोन्स इंडस्ट्रीयल एव्हरेज हा निर्देशांक आजतागायत अमेरिकन शेअर बाजाराची आणि अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती दर्शविण्याचे काम अविरतपणे करीत आहे. डाऊ हे प्रख्यात ‘द वाल स्ट्रीट जर्नल’ या मासिकाचे संपादक होते. सन १९०० ते १९०२ या काळात वाल स्ट्रीट जर्नल मध्ये लिहिलेल्या संपादकीय लेखातूनच सुप्रसिद्ध ‘डाऊ थेअरी’ चा उगम झाला. १९०२ मध्ये डाऊ यांच्या निधनानंतर संपादक झालेल्या विल्यम हेमिल्टन यांनी डाऊ यांच्या लिखाणाला डाऊ थेअरी असे नाव दिले.
मूळ डाऊ थेअरीचा हेतू, शेअर बाजाराच्या निर्देशांका वरून अर्थव्यवस्थेची नाडीपरीक्षा करण्याचा होता. डाऊ यांच्या शिष्यांनी तिचा उपयोग बाजाराचा कल आणि शेअरच्या खरेदी-विक्रीचे निर्णय घेण्यासाठी करून घेतला. हे शिष्य स्वत:ला ‘तांत्रिक विश्लेषक’ अथवा ‘चार्तीस्त’ असे म्हणवून घेतात.

डाऊ थेअरीची तत्वे

१) बाजाराचा निर्देशांक अथवा शेअरचा अभाव, आत्ताच्या घटकेला बाजारातील सर्व खेळाडू काय करीत आहेत ते सांगत असतो. म्हणजेच शेअरच्या मागणी आणि पुरवठा याचा विचार करूनच त्याची सध्याची किंमत ठरत असते. मागणी अथवा पुरवठ्यात बदल झाल्यास त्याचा भाव बदलतो.

२) कोणत्याही क्षणी बाजारात प्रामुख्याने तीन प्रवाह सुरु असतात. मुख्य प्रवाह प्रायमरी ट्रेण्ड, दुय्यम किंवा सेकंडरी ट्रेण्ड आणि किरकोळ प्रवाह (मायनरी ट्रेण्ड).
बाजाराचा प्रमुख प्रवाह अथवा कल वाढण्याकडे असल्यास त्याला तेजी (बुल मार्केट) म्हणतात. निर्देशांक किंवा शेअरचा भाव दररोज अथवा दर आठवड्याला वाढ दाखवीत असल्यास बाजार/ शेअर तेजीत आहे असे म्हटले जाते. याउलट तो खाली जात असल्यास ते मंदीचे लक्षण मानले जाते. तेजी किंवा मंदी एकदा सुरु झाली की ती कमीत कमी एक वर्ष टिकते आणि कित्येक वर्षे चालू राहू शकते.
बाजारातील दुय्यम अथवा उपप्रवाह हा प्रमुख प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहत असतो. यालाच बुल मार्केटमधील करेक्शन आणि बेअर मार्केट मधील रेली असे म्हणतात. हे करेक्शन / रेली १-३ महिन्यापर्यंत चालू शकते आणि मुख्य प्रवाहाला १/३ ते २/३ इतके विरुद्ध दिशेत खेचू शकते.
दुय्यम प्रवाह हा अनेक किरकोळ प्रवाहाचा बनलेला असतो. किरकोळ प्रवाह १ दिवसापासून ते ३ आठवड्यापर्यंत टिकू शकतो.
बाजारात खरेदी –विक्री ठरविताना बाजाराचा प्रमुख आणि दुय्यम कल कसा आहे ते तपासणे महत्वाचे असते. डाऊ थेअरी दिवसभरातील चढ-उताताकडे दुर्लक्ष करते व फक्त बंद भावावरच लक्ष केंद्रित करते, तसेच किरकोळ प्रवाहाकडे सुद्धा दुर्लक्ष केले जाते, करण डाऊ थेअरीच्या मते किरकोळ प्रवाहात अफरातफर करणे काहीजणांना शक्य असते. तर बाजारात प्रमुख अथवा दुय्यम कल कृत्रिमरीत्या बदलणे खुपच अवघड असते.

३) बुल मार्केट :

हे सामान्यत: ३ टप्प्यामध्ये वाढत जाते. पहिल्या टप्प्यात अर्थव्यवस्थेत सर्वत्र मंदी असते आणि सामान्य गुंतवणूकदार शेअर बाजारापासून दूर असतो. परंतु दूरदृष्टी असलेल्या अनुभवी खेळाडूना कळून चुकलेले असते की, आता मंदी संपत आली आहे आणि ते खरेदी सुरु करतात व त्यामुळे मार्केट वर जायला सुरुवात होते.
दुस-या टप्प्यात कंपन्याची कामगिरी पाहून गुंतवणुक करणारी विश्लेषक मंडळी कंपन्याचा वाढता नफा बघून खरेदी करतात आणि त्यामुळे मार्केट अजून वर जाते. शेवटच्या टप्प्यात सर्व काही ठीकठाक चालले अशी खात्री झाल्यामुळे सामान्य गुंतवणूकदार नेमके नको तेव्हा बाजारात उडी मारतो. या बुल मार्केटच्या शेवटच्या टप्प्यात बाजारातील सट्ट्याला उधाण आलेले असते.

४) त्यानंतर निश्चित पणे येणारे बेअर मार्केट हे सुद्धा ३ टप्प्यात खाली घसरते. दूरदृष्टी असलेल्या (तेजि-मंदीचि आवर्तने पचवीलेल्या या गुंतवणूकदारांना कल्पना असते, की कंपन्याच्या नफ्याची वाढ मंदावत आहे, ते शेअर्सची विक्री सुरु करतात. त्यामुळे मार्केट खाली जाऊ लागते. मार्केटला खाली जाताना पाहून अधिकाधिक गुंतवणूकदार घाबरून विक्री करतात (पेनिक सेलिंग). त्यामुळे शेअर्सचा पुरवठा वाढून मार्केट अजून खाली जाते. आता मात्र सर्व गुंतवणूकदारांचा धीर सुटून जे काय मिळतय ते घेऊन बाजारातून बाहेर पडण्याचा ते प्रयत्न करतात. (डिस्ट्रेस सेलिंग). मार्जिनवर खरेदी करणारे, शेअर्स गहाण टाकून, कर्ज काढून व्यवहार करणारे आणि डेरिव्हेटिव्हस् मध्ये व्यवहार करणा-या साहसी मंडळीचे या टप्प्यात प्रचंड नुकसान होते.

या तेजी-मंदीच्या आवर्तनात सर्वात जास्ती कमावतात ते दूरदृष्टीवाले मुरलेले खिलाडी. त्यांच्या खालोखाल कमाई करतात विश्लेषक मंडळी. चढ्या भावाला खरेदी आणि पडलेल्या भावांना विक्री करणारे सामान्य गुंतवणूकदार मात्र जखमा चाटत पुढील तेजीची वाट बघत बसतात. गुंतवणुक गुरुंचा सल्ला मानल्यास आणि डाऊ थेअरी माहित असल्यास ही वेळ आपल्यावर नक्कीच येणार नाही.

Share This Post

Post Comment