सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२१) – मितेश ताके
शेअरबाजारातील काही कंपन्या आपल्याला झालेल्या नफ्यातील काही हिस्सा शेअरहोल्डर्सला डिव्हिडंड म्हणून वाटतात. ज्या कंपन्या असा पुरेसा आणि नियमित डिव्हिडंड देतात त्यांचे शेअर खरेदी करणे बँक फिक्स डिपॉजिटला चांगला पर्याय ठरू शकतात. नियमित डिव्हिडंड देणाऱ्या काही कंपन्या वर्षातून २-३ वेळेस तर काही फक्त एकदाच देतात. या कंपन्या पेन्शनर्स फेव्हरेट म्हणून ओळखल्या जातात.
अर्थात हे पक्के ध्यानात घ्या की कंपनीने दरवर्षी डिव्हिडंड दिलाच पाहिजे अशी सक्ती नसते. समजा एखादया कंपनीने गेली १० वर्षे सलग डिव्हिडंड दिला म्हणजे ११ व्या वर्षी पण देईलच याची काहीही खात्री नसते. दुसरे महत्वाचे म्हणजे शेअर बाजार कधी पण आणि किती पण कोसळू शकतो.
आता समाजा अश्या कंपन्या शोधायच्या तर कशा हे आपण पाहू
कंपनी डिव्हिडंड जाहीर करताना % मध्ये जाहीर करते. त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका कारण ते % फेस व्हॅल्यूचे असतात मार्केट प्राईजचे नाही. सध्या बऱ्याच कंपन्यांची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे (यापेक्षा वेगळी असू शकते ), पण मार्केट व्हॅल्यू / करंट प्राईज काही हजार रुपये पण आहे.
फेस व्हॅल्यू म्हणजे कंपनीने सुरवातीला शेअर वितरित केला तेव्हा त्याची किंमत फक्त १० रुपयेच होती ती आता वाढत वाढत काही हजार रुपये करंट प्राईज झाली आहे किंवा कंपनीने १० रुपये किंमतीचा शेअर कंपनींनेच जास्तीचे पैसे ( प्रीमियम ) घेऊन शेअरहोल्डरला विकला आहे.
किती % डिव्हिडंड वाटला त्याऐवजी डिव्हिडंड यिल्ड पहायचे असते. डिव्हिडंड यिल्ड म्हणजे करंट प्राईजच्या किती % डिव्हिडंड मिळाला. हे सर्व समजून घेण्यासाठी खाली उदाहरण पाहू –
समाजा एक कंपनी आहे तिच्या शेअरची फेस व्हॅल्यू १० रुपये आहे आणि आताची मार्केट मधील शेअरची किंमत २०० रुपये आहे. जर मी तो शेअर आता २०० रुपयांना शेअरबाजारातून खरेदी केला आणि कंपनीने त्यावर १००% डिव्हिडंड जाहीर केला तर मला प्रति शेअर २०० रुपये मिळणार नसून १० रुपये मिळणार आहेत.
येथे फेस व्हॅल्यू = १० रु.
मार्केट प्राईज / करंट शेअर प्राईज = २०० रु.
कंपनीने जाहीर केलेला डिव्हिडंड (फेस व्हॅल्यूच्या ) = १०० %
शेअरहोल्डरला मिळणारी डिव्हिडंडची रक्कम = १० रु.
२०० रुपये गुंतवणुकीवर १० रुपये डिव्हिडंड मिळाला म्हणजेच डिव्हिडंड यिल्ड झाले = ५ %
म्हणजे आपण किती रकमेला शेअर घेतला आणि त्यावर किती टक्के डिव्हिडंड मिळाला त्याला डिव्हिडंड यिल्ड म्हणतात. जो शेवटचा वार्षिक डिव्हिडंड मिळाला आहे तो आणि आताची शेअरची किंमत या दोन बाबी डिव्हिडंड यिल्ड मोजताना विचारात घेतात.
जर एखादया कंपनीने एकाच वर्षात ३ डिव्हिडंड दिले तर पहिल्या दोनला अंतरिम ( Intrem ) व शेवटच्याला अंतिम ( Final ) डिव्हिडंड म्हणतात. या तिन्ही डिव्हिडंडची बेरीज म्हणजे वार्षिक डिव्हिडंड.
आता डिव्हिडंड प्रकरण आपल्यला समजले असेल ! यानंतर सध्या बाजारातील अशा चांगल्या डिव्हिडंड यिल्ड असलेल्या ज्या फिक्स डिपॉजिटला पर्याय ठरू शकतील अशा कंपन्या मी शोधल्या आहेत त्यांची यादी खालील प्रमाणे
१. Rural Electrification Corporation (BSE: 532955 | NSE: RECLTD )
फेस व्हॅल्यू = १० रु.
मार्केट प्राईज = १२५. ६० रु. (१५/११/१६)
करंट डिव्हिडंड यिल्ड = १३. ६१ %
डिव्हिडंडचा इतिहास फेस व्हॅल्यूच्या % –
मार्च १६ = १७१ % ( १७. १० रुपये प्रति शेअर )
मार्च १५ = १०७ % ( १०.७० रुपये प्रति शेअर )
मार्च १४ = ९५ % ( ९.५० रुपये प्रति शेअर )
मार्च १३ = ८२.५० % ( ८.२५ रुपये प्रति शेअर )
मार्च १२ = ७५ % ( ७. ५० रुपये प्रति शेअर )
२. Power Finance Corporation (BSE: 532810 | NSE: PFC )
फेस व्हॅल्यू = १० रु.
मार्केट प्राईज = ११६.१० रु. (१५/११/१६)
करंट डिव्हिडंड यिल्ड = ११. ९७ %
डिव्हिडंडचा इतिहास फेस व्हॅल्यूच्या % –
मार्च १६ = १३९ % ( १३. ९० रुपये प्रति शेअर )
मार्च १५ = ९१ % ( ९. १० रुपये प्रति शेअर )
मार्च १४ = ९० % ( ९ रुपये प्रति शेअर )
मार्च १३ = ७० % ( ७ रुपये प्रति शेअर )
मार्च १२ = ६० % ( ६ रुपये प्रति शेअर )
३. NMDC ( BSE: 526371 | NSE: NMDC )
फेस व्हॅल्यू = १ रु.
मार्केट प्राईज = ११७.७० रु. (१५/११/१६)
करंट डिव्हिडंड यिल्ड = ९.३५ %
डिव्हिडंडचा इतिहास फेस व्हॅल्यूच्या % –
मार्च १६ = ११०० % ( ११ रुपये प्रति शेअर )
मार्च १५ = ८५५ % ( ८.५५ रुपये प्रति शेअर )
मार्च १४ = ८५० % ( ८.५० रुपये प्रति शेअर )
मार्च १३ = ७०० % ( ७ रुपये प्रति शेअर )
मार्च १२ = ४५० % ( ४.५० रुपये प्रति शेअर )
४. Coal India ( BSE: 533278 | NSE: COALINDIA )
फेस व्हॅल्यू = १० रु.
मार्केट प्राईज = ३१३. ६५ रु. (१५/११/१६)
करंट डिव्हिडंड यिल्ड = ८.७४%
डिव्हिडंडचा इतिहास फेस व्हॅल्यूच्या % –
मार्च १६ = २७४ % ( २७. ४० रुपये प्रति शेअर )
मार्च १५ = २०७ % ( २०. ७० रुपये प्रति शेअर )
मार्च १४ = २९० % ( २९ रुपये प्रति शेअर )
मार्च १३ = १४० % ( १४ रुपये प्रति शेअर )
मार्च १२ = १०० % ( १० रुपये प्रति शेअर )
अशा मिळणाऱ्या डिव्हिडंडचा असून एक फायदा असतो ते टॅक्सफ्री असतात तर एफ डी वर मिळणारे व्याज टॅक्सेबल असते.
मित्रांनो याचा अर्थ लगेच आपली एफ. डी. तोडायची आणि हे शेअर विकत घ्यायचे असे नाही. मुळात जर आपण वृद्ध असाल तर शेअर बाजारात अजिबात पैसे गुंतवू नका किंवा आपल्याकडील पैश्याच्या फक्त १०-१२ % च गुंतवा कारण हा प्रकार फार फार जोखमीचा असतो. तसेच गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या.
इतरांसाठी मात्र असा सल्ला राहील की वरती दिलेल्या निकषांचा नीट अभ्यास करा. जेव्हा जेव्हा बाजारात मंदी येते तेव्हा तेव्हा असे भरपूर डिव्हिडंड यिल्ड असणारे शेअर शोधा. जर आपली जोखीम घ्यायची तयारी असेल, स्वतः जबाबदारी घ्यायची तयारी असेल तर आणि तरच याचा विचार करा.
यात अजून एक प्रकारे फायदा होऊ शकतो किंमत कमी झाली की विकत घ्या खूप वाढली की विका त्यावर नफा होईलच पण सोबत डिव्हिडंड पण मिळत राहील म्हणजे डबल फायदा !
यात अजून एक फायदा होऊ शकतो जर कंपनीला खूपच जास्त फायदा झाला किंवा रिझर्व्ह – सरप्लस खूप वाढले तर बोनस शेअर्स पण मिळू शकतात म्हणजे तिहेरी फायदा !
चला तर मग लागा अभ्यासाला !
—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-
Posted on नोव्हेंबर 15, 2016
Leave a comment