तुम्ही इंन्वेस्टर आहात की ट्रेडर

तुम्ही इंन्वेस्टर आहात की ट्रेडर

बरेच लोकांचा या दोन शब्दात गोंधळ होतो. मराठीत इंन्वेस्टर = गुंतवणूकदार व ट्रेडर = व्यापारी. गुंतवणूकदार गुतंवणूक करतो आणि त्यावर परतावा मिळवतो तर व्यापारी खरेदी विक्री करतो आणि त्यावर नफा कमावतो.

एक उदाहरण पाहू म्हणजे फरक अधिक स्पष्ट होईल. समजा एक जण गाय विकत घेतो आणि घरी आणतो. तो रोज गायीचे दुध काढतो, हवे तेवढे घरी ठेवतो उरलेले विकतो. त्याला दूध, शेण आणि गायीला होणारे पिल्लू असा फायदा होतो. तो झाला इंन्वेस्टर! एकदाच खरेदी करायची आणि नियमित थोडा थोडा लाभ घ्यायचा !!
तर दुसरा गायीचा व्यापारी बाजारात सकाळी गाय विकत घेतो दोन पैसे जास्त मिळाले की अगदी संध्याकाळी सुध्दा विकून टाकतो. नाहीतर थोडा काळ थांबून मग विकतो. तो झाला ट्रेडर! सतत कमी किंमतीत खरेदी करायची आणि जास्त किंमतीत विकायचे, नफा मिळवत राहायचा!!

आता इंन्वेस्टरला फायदा कसा होतो ते पाहू !
जेव्हा इंन्वेस्टर एखादा शेअर विकत घेतो तेव्हा तो त्या कंपनीचा एक प्रकारचा छोटा भागीदारच बनतो, छोटा मालकच बनतो. जेव्हा कंपनीला उद्योगधंदा करून नफा होतो तर तो मालकांना वाटला पाहिजे. शेअरधारक मालकच असतात तर तो झालेला नफा शेअरधारकांना डिविडंड म्हणून वाटला जातो. जर खूपच नफा झाला तर कंपनी जास्तीचे शेअर पण वाटते त्याला म्हणतात बोनस शेअर. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे जास्तीचे पैसे मोजावे लागत नाही. आणि हळू हळू इंन्वेस्टरकडे शेअर्सची संख्या वाढत जाते.

काही कंपन्या वर्षानुवर्षे नियमित डिविडंड जाहीर करतात. बरीच सेवानिवृत्त मंडळी अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करतात आणि दर वर्षी १०-१२% डिविडंड मिळवतात. एक प्रकारचे निवृत्ती वेतन !

एखादी इन्फोसिस सारखी कंपनी तर बोनस शेअर देऊन देऊन गुंतवणूकदाराला चक्क करोडपती बनवते. ज्याने इन्फोसिस मध्ये १९९३ ला फक्त ९,५०० रु गुंतवले ( इन्फोसिसचे शेअर्स घेतले), त्या ९,५०० चे आज २३ वर्षांत साधारणपणे ४ करोड रुपये झाले आहेत. अर्थात सगळ्याच कंपन्या इन्फोसिस होत नसतात. नाहीतर कुणीच कामधंदा केला नसता सगळ्यांनी फक्त गुंतवणूकच केली असती !

—————————-

Share This Post

Post Comment