सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२३ ) – मितेश ताके
दर ८ ते १० वर्षांनी शेअर मार्केट मध्ये मोठी मंदी येत असते असा इतिहास आहे. या पूर्वी शेवटची मोठी मंदी २००९ साली आली होती. आता २०१७ चालू आहे म्हणजे इतिहासानुसार मोठ्या मंदीची वेळ झाली आहे. आता ही मंदी कधी पण येऊ शकते- आज, उद्या किंवा कदाचित १ वर्षांनी ! पण मार्केट कोसळणार हे नक्की !!
हे सांगण्यासाठी तुम्ही शेअर मार्केट तज्ञ असण्याची गरज नाही. साधी गोष्ट आहे जे मार्केट अनाठाई वरती जाते ते केव्हा ना केव्हा खाली येतेच. तेव्हा आज ना उद्या मार्केट कोसळणार हे लक्षात घ्या आणि सावध राहा.
का कोसळेल ? काय कारण असेल ?
तर कोसळण्यासाठी काहीही निमित्त पुरेल- आर्थिक बुडबुडा फुटणे, आर्थिक घोटाळा, आर्थिक संकट, औद्योगिक मंदी, राजकीय उलथापालथ, युध्द, दहशतवादी हल्ला, नैसर्गिक आपत्ती, इ .
२००२ साली सेन्सेक्स मध्ये तेजी सुरु झाली तेव्हा सेन्सेक्स होता ३०००. वाढत वाढत त्याने २००८ साली २१००० चा टप्पा गाठला. नंतर मात्र जी घसरगुंडी सुरु झाली तो २००९ साली पार ८००० ला आला.
२००९ साली ८०००ला असणारा सेन्सेक्स आता ३०,०००च्या दरम्यान आहे. आता किती वाढेल हे सांगता येत नाही कदाचित ३७,००० पण पार करेल आणि किती कोसळेल हे पण सांगता येत नाही कदाचित १५००० च्या खाली पण जाईल.
मित्रांनो मी तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सांगतोय का?
तर मुळीच नाही ! फक्त इतिहास तुम्हाला सांगतोय यातून शिकायचे आणि सावधपणे ट्रेडिंग करायचे. जसजसे मार्केट वर वर जाईल तसतसे अधिक अधिक सावध राहा आणि स्टॉप लॉस चा योग्य वापर करा ! यश तुमचेच आहे !!
ज्यांना थोडा खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी-
सेन्सेक्सचा पी/ई रेशो २००८ साली ओव्हर व्हॅल्यूड झाला होता- तो २५ च्या वर गेला होता. आता सुद्धा त्याची वाटचाल त्याच दिशेने चालू आहे सध्या तो २३ च्या वर आहे.
आणि जेव्हा २००९ साली सेन्सेक्सने तळ गाठला होता तेव्हा तो १३ पर्यंत खाली आलेला होता.
हुशार इन्व्हेस्टर्स सेन्सेक्सचा पी/ई रेशो १४-१५ च्या खाली आला की ब्लू चीप शेअर्स खरेदी करतात आणि ८-१० वर्षांनी २४-२५ च्या वर गेला की विक्री करतात. पहा तुमच्याकडे एव्हढा संयम असेल तर कॅश रेडी ठेवा लवकरच संधी येईल !
अभ्यासासाठी शुभेच्छा !