दामदुप्पट

 

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -३१ ) – मितेश ताके

गुंतवणूकदारांना दामदुप्पट हा शब्द खूप आवडतो. आपले पैसे किती काळात दुप्पट होतील अशी उत्सुकता सर्वानाच असते. यासाठी गुंतवणूक क्षेत्रात ७२ चा नियम प्रसिध्द आहे तो समजावून घेऊ –

७२ चा नियम –

७२ या आकड्याला जर वार्षिक व्याज दराने / वार्षिक परताव्याच्या दराने भागले तर आपले पैसे किती वर्षात दामदुप्पट होतील तो आकडा मिळतो.

उदा. जर बँकेचा वार्षिक व्याज दर ८% असेल तर ७२ / ८ = ९. म्हणजे जर ८% दराने बँकेत ठेव ठेवली तर ९ वर्षाने आपले पैसे दुप्पट होतील.

जर एखाद्या शेअर मध्ये पैसे गुंतवले आणि त्यावर सरासरी वार्षिक परतावा (रिटर्न्स ) ३० % मिळाला तर तुमचे गुंतवलेले पैसे ७२/ ३० = २.४ वर्षात दुप्पट होतील.

या उलट जर तुम्हाला किती वर्षात आपले पैसे दुप्पट झाले हे माहित असेल तर त्यावरून परताव्याचा दर मिळू शकतो, त्यासाठी ७२ या आकड्याला तितक्या वर्षाने भागायचे.

उदा . जर आपण रिअल इस्टेट मध्ये पैसे गुंतवले आणि समजा आपले पैसे ३ वर्षात दुप्पट झाले, तर किती टक्के वार्षिक रिटर्न्स मिळाले ? यासाठी ७२ ला ३ ने भागावे लागेल. ७२/३ = २४. म्हणजे आपल्या गुंतवणुकीवर २४ % वार्षिक परतावा मिळाला .

सेन्सेक्स ची सुरवात १ एप्रिल १९७९ ला झाली तेव्हा हा निर्देशांक १०० होता, आता ऑक्टोबर २०१७ साली हा झाला आहे साधारणतः ३२०००. गेल्या साडे-अडतीस वर्षात सरासरी वाढ झाली आहे १६.४५ % प्रति वर्ष . या हिशोबाने सेन्सेक्स मध्ये सुरवातीपासून पैसे गुंतवले असते तर दर ४.३८ वर्षांनी आपले पैसे दुप्पट होत गेले असते.

आता असाच हिशोब शेअर बाजारातील सर्वात यशस्वी व्यतिमत्व श्री.वॉरेन बफे यांचा रिटर्न्स संदर्भात करू –

त्यांनी सरासरी वार्षिक रिटर्न्स २१.६० % इतके मिळविलेले आहेत . म्हणजे त्यांची संपत्ती दर ३.३३ वर्षांनी दुप्पट होत आली आहे.

तर दामदुप्पट चा कालावधी मोजण्यासाठी ७२ चा नियम लक्षात ठेवा !

अभ्यासासाठी शुभेच्छा !

—————————-

Share This Post

Post Comment