निफ्टी फिफ्टी

 

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२५ ) – मितेश ताके

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी फिफ्टी या इंडेक्स मध्ये ५० कंपन्या असतात. या पन्नास कंपन्यांच्या पी ई रेशोंची सरासरी म्हणजे निफ्टीचा पी ई रेशो होय.

मार्केटमध्ये तेजी यायला सुरवात होते तेव्हा इंडेक्सचा पी ई रेशो हळू हळू वाढू लागतो. या काळात सगळीकडे फक्त तेजीचीच चर्चा असते. सर्व गुंतवणूकदार हळू हळू तेजीत वाहवत जायला सुरवात करतात. विचार न करता गुंतवणूक वाढवत राहतात. शेअर्सचे भाव भसाभस वाढत असतात, लोक नफा बुक न करता फक्त वाढलेल्या आभासी संपत्तीचा आनंद लुटत असतात. शेवटी शेवटी तर मोह, लालच इतकी वाढते की कर्ज काढून पण गुंतवणूक सुरु करतात. मित्रांना, नातेवाईकांना “स्टॉकगुरु” बनून सल्ले द्यायला सुरवात करतात, त्यांना गुंतवणूक करायला भाग पडतात. सगळीकडे जल्लोष जल्लोष असतो. मार्केट मध्ये भावाचे रोज नवनवे विक्रम होत असतात. इंडेक्सच्या पी ई रेशोने पण उच्चाांक गाठलेला असतो.

आणि एक दिवस अचानक मार्केट पडायला सुरवात होते. गुंतवणूकदारांना वाटते की काही नाही चार दोन दिवसात सर्व ठीक होईल. मग मार्केट परत वर जाईल, तेव्हा नफा बुक करू. पण तसे घडत नाही आणि मार्केट खाली खाली जात राहते. पी ई रेशो पण कमी कमी होत असतो. गुंतवणूकदारांनी वाढलेले भाव पाहिलेले असतात, त्यांच्या मोहाने ते वाट पाहत राहतात आणि पाहतच राहतात. आता तर नफ्याचे तोट्यात रूपांतर झालेले असतात.

मार्केटमध्ये फार मंदी येते, शेअर्सचे भाव खूप खूप पडलेले असतात. तेव्हा इंडेक्सचा पी ई रेशो ही फार कमी झालेला असतो. या काळात मंदीमुळे सर्व गुंतवणूकदार फार घाबरलेले असतात. सगळीकडे भीतीचे आणि दुःखाचे वातावरण असते.आता तर जगबुडी होणार असे वातावरण असते. गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुका तोट्यात विकून बाहेर पडत असतात.

असे तेजी मंदीचे चक्र सतत सर्व प्रकारच्या बाजारात चालू असते. इतिहास असे सांगतो की शेअर बाजारात दर ८ ते १० वर्षांनी अशी तेजी मंदी येत असते.

शेअरमार्केट मध्ये जेव्हा प्रचंड तेजी येते, युफोरिया – वेडाची पातळी गाठते. तेव्हा लोक लालची बनून वेड्यासारखी गुंतवणूक करत असतात, मात्र जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार वॉरेन बफे या काळात विक्री करत असतात. आणि जेव्हा सर्व लोक मंदीमुळे बाजारातून बाहेर पडत असतात, तेव्हा मात्र बफे खूप स्वस्तात चांगले चांगले शेअर्स विकत घेत असतात. ही पद्धत वापरून वॉरेन बफे जगातील २ नंबरची सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

आता निफ्टीचा पी ई रेशो वापरून आपण पण वॉरेन बफे प्रमाणे घसघशीत नफा कसा कमावू शकतो ते पाहू –
१९९९ पासूनचा जर इतिहास पहिला तर निफ्टीचा जास्तीत जास्त पी ई रेशो २८. ४७ (११ फेब्रुवारी २०००) तर कमीत कमी पी ई रेशो १०.६८ (२७ ऑक्टोबर २००८) झाला होता. म्हणजे निफ्टीच्या पी ई रेशोची रेंज २८ ते ११ आहे.

निफ्टीचा पी/ई रेशो १४-१५ च्या खाली आला की ब्लू चीप शेअर्स टप्याटप्याने खरेदी करावेत किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात टप्याटप्याने पैसे गुंतवावेत आणि ८-१० वर्षांनी पी/ई रेशो २४-२५ च्या वर गेला की टप्याटप्याने विक्री करावी. भरभरून नफा मिळेल.

आता याचे एक उदाहरण पाहू-
२००९ साली जेव्हा खूप मंदी आली होती तेव्हा मार्च मध्ये निफ्टीचा पी ई रेशो झाला होता १३.३० आणि एशियन पेंट्सचा शेअर ७० रु. पर्यंत खाली आला होता. आता २०१७ साली निफ्टीचा पी ई रेशो जेव्हा २४ च्या वर गेला आहे एशियन पेंट्सच्या शेअरची किंमत १२०० रु. च्या दरम्यान आहे. म्हणजे ८ वर्षात साधारणतः १६०० % रिटर्न्स मिळाले आहेत, १७ पट वाढ झाली आहे.

आहे ना भारी फॉर्म्युला !

चला तर मग वॉरेन बफे सारखे बनण्यासाठी अभ्यास सुरु करा !
अभ्यासासाठी शुभेच्छा !!

—————————-

Share This Post

Post Comment