पी ई रेशो

 

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -२४ ) – मितेश ताके

शेअरबाजाराचा अभ्यास सुरु केल्यावर पी ई रेशो हा शब्द सुरवातीलाच हमखास भेटतो. आज त्याची ओळख आणि उपयोग समजून घेऊ…

त्यासाठी आधी अर्निंग पर शेअर (EPS) म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल.

जेव्हा एखादी कंपनी नफा कमावते तेव्हा समाजा तो सर्व नफा जर प्रत्येक शेअरधारकाला वाटला तर प्रत्येक शेअरच्या वाट्याला किती नफा येईल त्याला म्हणतात प्रति शेअर नफा किंवा प्रति शेअर कमाई किंवा अर्निंग पर शेअर (EPS)

पी ई रेशो म्हणजे प्राईज टू अर्निंग रेशो म्हणजे एका शेअरची सध्याची किंमत भागिले प्रति शेअर नफा
उदा. समजा एका शेअरची शेअर बाजारातील सध्याची किंमत आहे रु. २०० आणि प्रति शेअर नफा आहे रु. २० तर मग पी ई रेशो (P/E Ratio) झाला २००/२०= १०

आता याचा अर्थ असा झाला की सध्या गुंतवणूकदार नफ्याच्या १० पट पैसे द्यायला तयार आहेत किंवा गुंतवणूकदाराची गुंतवणूक परत मिळायला दहा वर्ष लागतील (जर असाच २० रु. नफा प्रतिवर्षी मिळत राहिला तर !)

आता पी ई रेशोचा उपयोग समजून घेऊ –
जर पी ई रेशो जास्त असेल तर शेअर महाग आहे आणि जर पी ई रेशो कमी असेल तर शेअर स्वस्त आहे हे समजते. तसेच एकाच क्षेत्रातील दोन कंपनीपैकी कोणती स्वस्त कोणती महाग हे ठरवण्यासाठी पण याचा उपयोग होतो.

समाजा एक शेअरची किंमत आहे १००० रु. आणि दुसऱ्याची किंमत आहे ५०० रु. नुसती किंमत पाहून असे वाटेल की पहिला शेअर महाग आहे. पण जर त्याचे पी ई रेशो अनुक्रमे १७ आणि २२ आहेत असे सांगितले तर आपल्या लक्षात येईल की १००० रु. चा शेअर स्वस्त आहे तर ५०० रु. चा महाग!

हे सर्व रेशो वगैरे आपण मोजत बसण्याची गरज नसते. शेअर बाजार विषयक वेबसाईटवर हे सर्व रेडिमेड मिळते आपण फक्त वाचून समजून घ्यायचे असते.

हा पी ई रेशो वापरून घसघशीत नफा कसा कमवीत येतो ते पुढील लेखात पाहू !

अभ्यासासाठी शुभेच्छा !

—————————-

Share This Post

Post Comment