भागाचे प्रकार (शेअर्स)

भागाचे प्रकार (शेअर्स)

भागाचे प्रकार (शेअर्स)

भाग (शेअर्स) निरनिराळ्या प्रकारचे असतात. प्रत्येकाचे हक्क व जबाबदारी वेगवेगळी असते. भाग विकत घेणा-याच्या स्वभावधर्मात फरक असतो. काही लोक भांडवलाच्या सुरक्षिततेला महत्व देतात व त्या सुरक्षिततेची खात्री मिळाली तर कमी लाभांश (डिव्हिडंड ) मिळाला तरी त्यांची हरकत नसते. काही लोक धाडसी प्रवृत्तीचे असतात. हे लोक जास्त लाभांश मिळाला तर भांडवला बाबत थोडा फार धोका पत्करण्यास तयार होतात. या सर्व लोकांना सोयीचे होईल अशा रीतीने कंपनी निरनिराळ्या प्रकारचे भाग काढते.

अग्रहक्काचे भाग :

या भागाच्या धारकांना इतर भागधारकांपेक्षा काही विशेष हक्क मिळतात. ते दोन प्रकारचे असतात. त्यांना एका ठराविक दराने पुरेसा नफा असल्यास लाभांश दिला जाईल अशी कंपनी हमी देते आणि जर कंपनीचे विसर्जन झाले तर इतर भागधारकापूर्वी या भागधारकांना भांडवल परत करण्यात येते. या भागधारकांच्या मतदानाच्या हक्कावर कंपनीच्या नियमावलीने काही निर्बंध घातलेले असतात.
या भागधारकामध्ये काही उपप्रकार असतात. त्यानुसार अग्रक्रम ठरवून परतावा दिला जातो.

अ) लाभांश गोठवणारे अग्रहक्काचे भाग :
अशा भागधारकांना दरवर्षी एका ठराविक दराने लाभांश दिला जाईल अशी कंपनी हमी देते. जर एखाद्या वर्षी हा लाभांश; नफा न झाल्याने देता आला नाही, तर तो लाभांश भागधारकांच्या खात्यावर साचत जातो. न दिलेला लाभांश कम्पनीच्या पुढील वर्षाच्या नफ्यातून प्रथम दिला जातो व राहिलेल्या नफ्यातून त्या वर्षीचा लाभांश वाटण्यात येतो.

आ) अधिक लाभांशाचा हक्क असणारे अग्रहक्काचे भाग :

अशा प्रकारचे अग्रहक्काचे भाग धारण करणा-यांना त्याना देऊ केलेल्या ठराविक लाभांशाखेरीज अधिक लाभांश मिळविण्याचा ह्क्क दिला जातो. ठराविक लाभांशाची रक्कम अग्रहक्काच्या भागधारकांना दिल्यावर आणि सामान्य भागधारकांना लाभांश दिल्यावर जर आणखी नफा उरला तर जादा उरलेल्या नफ्यात हिस्सा मिळण्याचा हक्क या भागदारांना दिलेला असतो. ज्या वेळेला कंपनी अशा प्रकारचे भाग काढते त्या वेळेला सामान्य भागावर द्यावयाच्या लाभांशावर काही कमाल मर्यादा घातली जाते. या कमाल दराने सामान्य भागांवर लाभांश दिल्यावर राहिलेला नफा, सामान्य भाग व अशा प्रकारचे अग्रहक्काचे भाग यामध्ये विभागला जातो.

इ) परतफेडीचे अग्रहक्काचे भाग :

साधारणत: भागाची रक्कम कंपनी विसर्जनाखेरीज भागदारांना कधीच परत करीत नाही. या नियमाला फक्त एकच अपवाद आहे. आणि तो म्हणजे परतफेडीच्या अग्रहक्काच्या भागाचा होय. या भागाची रक्कम ठराविक मुदतीनंतर कंपनीला परत करावी लागते किंवा ठराविक मुदतीची सूचना देऊन परत करता येते.

२) सामान्य भाग :

या प्रकारचे भाग सर्व कंपन्या विक्रीस काढतात. दरवर्षी प्रथम अग्रहक्काचे भाग धारण करणा-या भागधारकांना त्याच्या ठरलेल्या दराने लाभांश दिल्यानंतर, उरलेला नफा सामान्य भागधारकांत विभागण्यात येतो. मग लाभांशाचा दर जो येईल तो येईल. अशा रीतीने सामान्य भागावरील लाभांशाचा दर नफ्यावर अवलंबून असतो व तो दरवर्षी बदलत जातो. ज्या कंपन्या भरभराटीत असतात, त्या दरवर्षी सामान्य भागावर चांगला लाभांश जाहीर करतात. अशावेळी सामान्य भागधारकांना अग्रहक्काच्या भागधारका पेक्षा जास्त दराने लाभांश मिळतो. परंतु मंदीच्या काळात अग्रहक्काच्या भागधारकांना मिळणारा लाभांश कमी होत नाही व सामान्य भागधारकांना मात्र कमी दराने लाभांश मिळतो किंवा पुरेसा नफा न झाल्यास तो मिळतही नाही.
त्याचप्रमाणे कम्पनीच्या विसर्जनानंतर भांडवल परतीच्या वेळी कंपनीजवळील रकमेतून प्रथम अग्रहक्काच्या भागधारकाचे भांडवल परत केले जाते व नंतर पुरेशी रक्कम उरल्यास, समान्य भागाधारकाचे भांडवल परत केले जाते. पुरेशी रक्कम न उरल्यास भांडवला पैकी जेवढे शक्य असेल तेवढे परत केले जाते. अशारीतीने सामान्य भागधारकाना अनिश्च्हीतता व धोका यांना तोंड द्यावे लागते. परंतु कंपनी जर भरभराटीत असली तर लाभांश खूप मिळून त्याची भरपाई होण्याची शक्यता असते. म्हणून दूरदर्शी व धाडसी भांडवलदार योग्य कंपन्यातील सामान्य भागात भांडवल गुंतवण्याचे धाडस करण्याच्या खटपटीत असतात.

Share This Post

Post Comment