सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -३३ ) – मितेश ताके
मी २००७ साली शेअर बाजाराच्या अभ्यासाला सुरवात केली ती जगातील सर्वात श्रीमंत गुंतवणूक गुरु वॉरेन बफे यांच्यामुळे ! त्यावेळी त्यांनी नुकतीच काही अब्ज संपत्ती दान केली होती, त्यामुळे त्यांचे नाव माझ्या वाचनात आले होते. त्यांची इंटरनेटवर माहिती शोधल्यावर मला समजले की ही सर्व संपत्ती त्यांनी स्वतःच्या बुद्धीने, सचोटीने, प्रामाणिकपणे शेअरबाजारातून कमावली आहे.
मी एक मध्यमवर्गीय शेतकरी घरातला माणूस, कौटुंबिक कारणामुळे करिअरची वाट लागलेली, खाण्यापिण्याचे वांधे ! मला पैसा तर कमवायचा होता पण प्रामाणिकपणे, मी चांगल्या मार्गाच्या शोधातच होतो त्यात वॉरेन बफेंची माहिती मिळाली आणि अभ्यासाला लागलो. त्याची तत्वे समजून घेतली आणि त्यानुसार शेअर्स खरेदी केले पण वर्षभरात तोटाच तोटा झाला. वॉरेन बफे फ्रॉड आहे म्हणून शिव्या देऊन दुसऱ्या गुरूंच्या अभ्यासाला लागलो. तेव्हा लक्षात आले नाही पण तोट्याचे कारण माझा अर्धवट अभ्यास आणि २००८ सालची मंदी होती.
आता फिरून परत वॉरेन बफेंची तत्वे पटली आहेत. त्यानुसारच मी गुंतवणूक करणार आहे पण त्या तत्वात थोडे बदल करून !
त्यांच्या तत्वात तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत –
१. योग्य कंपनी अभ्यासपूर्वक शोधणे .
२. कमी किंमतीला त्या कंपनीचा शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करणे .
३. योग्य विक्री किंमत मिळेपर्यंत ८/१० वर्ष संयम बाळगणे.
यातील दोन तत्व मी अंमलात आणणार आणि एक तत्व मात्र तज्ञांवर सोडणार आहे! कसे? ते पुढील प्रमाणे
तत्व क्रमांक २ व ३ मी पाळणार. निफ्टीचा पी / इ रेशो १४ च्या खाली गेला की मंदीत टप्प्या टप्प्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आणि तो रेशो ८/१० वर्षांनी २४ च्या वर गेला की तेजीत टप्प्या टप्प्याने विक्री करणार.
शेअरबाजारातील अनाठाई तेजी आणि अनाठाई मंदीविषयी वॉरेन म्हणतात, “ ( महातेजीत ) जेव्हा लोक हावरट सारखे खरेदी करत सुटतात तेव्हा मी घाबरट बनतो आणि (महामंदीत) जेव्हा लोक घाबराटसारखे शेअर्स विकत असतात तेव्हा मी हावरट बनतो ( आणि चांगले शेअर्स खूप कमी किंमतीला खरेदी करतो ) ”
निफ्टीचा पी / इ रेशो वापरून खरेदी विक्री केली तर वॉरेन यांच्या वरील वाक्यानुसार आपण खरेदी विक्री करतो .
आता राहता राहिला प्रश्न तत्व क्रमांक एकचा !
तर माझ्या असे लक्षात आले आहे की भारतीय शेअर बाजारात चांगली कंपनी शोधणे प्रचंड अवघड आहे त्याचे कारण एक तर माझ्या मर्यादा आणि दुसरे म्हणजे आपल्या भ्र्रष्टाचारी कंपन्यांमधील लुटुपुटुचा कार्पोरेट गव्हर्नन्स ! जोपर्यंत एखादे प्रकरण बाहेर येत नाही तोपर्यंत येथे सर्व साव आहेत !!
मग स्वतः कंपन्या न शोधात त्याऐवजी मी म्युच्युअल फंडांच्या टॉपच्या पाच स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक करणार आहे. कारण खूप सोपे आहे जर एखादी कंपनी डुबणार असेल तर या कार्पोरेट गुंतवणूकदारांना आतल्या बातम्या तरी समजतात किंवा त्यांच्या टेक्निकल चार्टवर तरी त्यांना समजते आणि ते वेळीच त्या कंपनीच्या शेअर्समधून बाहेर पडतात. याचे ठळक उदाहरण म्हणजे सत्यम कंप्यूटर चा शेअर ! ज्यावेळी सत्यम चा भ्रष्टाचार बाहेर आला त्यावेळी सर्व मोठ्या गुंतणूकदारानी थोडे दिवस आधीच त्यातून गुंतवणूक काढून घेतलेली होती आणि फक्त सामान्य गुंतवणूकदारांचाच पैसा त्यात अडकलेला होता !
दुसरी गोष्ट म्हणजे ते फंड मॅनेजर सेफ गेम खेळतात आपली नोकरी जाणार नाही अशा बेतानेच त्यातल्या त्यात सुरक्षित शेअर मध्ये गुंतवणूक करत असतात.
आता स्मॉल कॅप फंडच का ? तर कारण सोपे आहे महामंदीत स्मॉल कॅप शेअर्स खूप कोसळतात, त्याच प्रमाणात म्युच्युअल फंडाच्या एन ए व्हि पण ! म्हणजे आपल्याला खूप स्वस्तात गुंतवणूक करता येईल आणि महातेजीत त्यांच्या अनाठायी किंमती वाढतात, त्याच प्रमाणात म्युच्युअल फंडाच्या एन ए व्हि पण ! त्यामुळे आपण चढ्या भावाने विक्री करू आणि जास्तीचा नफा पदरात पडून घेऊ .
आता एका फंडाऐवजी पाच फंड का ? तर डायव्हर्सिफिकेशन ! समजा एखाद्या फंडाचा फंड मॅनेजर नोकरी सोडून गेला किंवा इतर काही कारणाने त्या फंडाचा परतावा – रिटर्न्स घसरले तर उरलेले चार फंड त्या लंगड्या फंडाला तारून नेतील !
अशा प्रकारे गुंतवणूक केली तर ८/१० वर्षात ५ ते १० पट परतावा मिळणे अपेक्षित आहे !
वाचा, समजून घ्या आणि पटले तर या अनुषंगाने अभ्यास करा !
अभ्यासासाठी शुभेच्छा !
—————————-
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा –
https://www.facebook.com/StockMarketinSimpleMarathi
—————————-