अजय वाळिंबे

जेके समूहाची जे के लक्ष्मी सीमेंट (जेकेएलसी) या कंपनीची स्थापना झाली त्यावेळी कंपनीने केवळ वार्षिक ०.५ मेट्रिक टन क्षमतेसह प्रथम सीमेंट प्रकल्प स्थापित केला होता. मात्र गेल्या ३८ वर्षांत कंपनीने सीमेंट प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता उदयपूर सीमेंट वर्क्‍स या उपकंपनीसह १२.५ मिलियन टनांपर्यंत नेली आहे. तसेच क्लिंकर क्षमतेत वाढ होऊन ती वार्षिक ८८ मिलियन टनांवर नेली आहे. कंपनीचे राजस्थानमधील सिरोही आणि उदयपूर येथे आणि दुर्ग (छत्तीसगड) येथे इंटिग्रेटेड प्रकल्प असून, झज्जर (हरियाणा), कटक (ओडिशा) आणि गुजरातमध्ये कलोल व सूरत येथे ग्राइंडिंग युनिट आहेत. भारतातील अल्प उत्पादन खर्च असणाऱ्या सीमेंट उत्पादक कंपन्यांमध्ये जेकेएलसीची गणना होते. कंपनीचा सिरोही येथे ५४ मेगावॅटचा कॅप्टिव्ह वीजनिर्मिती प्रकल्प असून, ५४ मेगावॅटचा डब्ल्यूएचआर (वेस्टेड हिट रिकव्हरी) प्रकल्प आणि ६ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प आहे. ज्यामुळे संपूर्ण उत्तर प्रदेशात विजेबाबात स्वयंपूर्ण असणारा हा प्रकल्प आहे. दुर्ग युनिटमध्ये कंपनीचा सात मेगावॅट डब्ल्यूएचआर प्रकल्प असून २० मेगावॅटचा कॅप्टिव्ह वीजनिर्मिती प्रकल्प आहे. कंपनीने येथील उत्पादन क्षमतादेखील २.७० मिलियन टनांपर्यंत वाढवली आहे. कंपनीच्या स्वत:च्या लाइम स्टोन खाणी असल्याने कच्चा मालदेखील रास्त दरात उपलब्ध होतो. कंपनी मुख्यत्वे पीपीसी ब्लेंडेड सीमेंट तसेच पोर्टलँड सीमेंटचे उत्पादन करते. कंपनीचे जेके लक्ष्मी प्रो+, जेके लक्ष्मी हेवी, प्लॅटिनम हेवी डय़ुटी, जेकेएलसी सिक्सर, जेके लक्ष्मी पॉवर मिक्स आदी ब्रॅण्ड प्रसिद्ध असून कंपनी सीमेंट ब्लॉक, जिप्सम तसेच सीमेंट पुट्टीचेदेखील उत्पादन आणि विक्री करते.

गेली काही वर्षे कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून कंपनीने आपला उत्पादन खर्च तसेच कर्जभारदेखील बऱ्यापैकी कमी केला आहे. करोनाकाळातही कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत ११.७ टक्के वाढ नोंदवून ती १,०४४.७७ कोटींवर गेली आहे तर नक्त नफ्यात तब्बल ७५.५ टक्के वाढ होऊन तो ८०.५८ कोटींवर गेला आहे. याचप्रमाणे कंपनीच्या सहामाहीच्या नफ्यात ४६.५ टक्के वाढ होऊन तो १२५ कोटींवर गेला आहे. आगामी कालावधीत पायाभूत सुविधांच्या प्राधान्यामुळे सीमेंट उत्पादनांना बाजारपेठेत वाढती मागणी अपेक्षित असून कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. उत्तम आणि अनुभवी प्रवर्तक, मर्यादित उत्पादन खर्च, प्रस्थापित ब्रॅण्ड आणि अर्थात उत्तम गुणवत्ता यामुळे एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून जेके लक्ष्मी सीमेंट एक आकर्षक गुंतवणूक ठरू शकते.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

जे के लक्ष्मी सीमेंट लि. (बीएसई कोड – ५००३८०)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ३४३.७०

स्मॉल कॅप

प्रवर्तक :जे के समूह

व्यवसाय : सीमेंट / सीमेंट उत्पादने

बाजार भांडवल : रु. ४,०४४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. ३८९/१८०

भागभांडवली भरणा : रु. १३१.५४ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ४६.२१

परदेशी गुंतवणूकदार ९.९२

बँक/ म्यु. फंड/ सरकार २३.५७

इतर/ जनता २०.३०

पुस्तकी मूल्य : रु. १५५

दर्शनी मूल्य : रु. ५/-

लाभांश : ५०%

प्रति समभाग उत्पन्न : रु. २४.४८

पी/ई गुणोत्तर : १३.८

समग्र पी/ई गुणोत्तर : १६.८

डेट इक्विटी गुणोत्तर : ०.८९

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : २.९७

रिटर्न ऑन कॅपिटल : १६.३

बीटा : ०.७

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

THANKS LOKSATTA

Share This Post

Post Comment