चमनलाल सेठिया एक्सपोर्ट लिमिटेड (सीएलएसई)

चमनलाल सेठिया एक्सपोर्ट लिमिटेड (सीएलएसई)

अजय वाळिंबे

आज सुचविलेली कंपनी ‘चमनलाल सेठिया एक्सपोर्ट लिमिटेड (सीएलएसई)’ अनेक वाचक गुंतवणूकदारांना कदाचित माहीतही नसेल. १९९४ मध्ये चमनलाल सेठिया यांनी स्थापन केलेली आणि केवळ ४३० कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या कंपनीचे समभाग मुंबई शेअर बाजारात गेली अनेक वर्षे सूचिबद्ध आहेत. कंपनीचे अत्याधुनिक उत्पादन केंद्र हरियाणातील करनाल येथे असून कंपनीची आठवडय़ाची उत्पादन क्षमता सुमारे ३६० मेट्रिक टन आहे. सीएलएसई आज भारतातील मान्यताप्राप्त स्टार एक्सपोर्ट हाऊस असून सर्व प्रकारच्या बासमती तांदळाच्या सर्वात जुन्या आणि हाय-टेक राइस मिलरपैकी एक महत्त्वाची निर्यातदार आहे.

प्रवर्तकांच्या ४५ वर्षांपेक्षा जास्त काळाच्या अनुभवामुळे सीएलएसईची देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये मजबूत स्थिती आहे. उच्च गुणवत्तेच्या मानकांवर आधारित जवळपास ८० देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या सीएलएसईचे आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी दृढ संबंध आहेत. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या एकूण उलाढालीत ९० टक्के वाटा निर्यातीचा होता. निर्यात आणि देशांतर्गत बाजारपेठेत कंपनी प्रामुख्याने खासगी लेबल व्यवसायाची पूर्तता करते. परंतु जवळपास ३० टक्के उत्पन्न हे मिठास, बेगम आणि महारानी या तिच्या सुप्रसिद्ध ब्रँडच्या विक्रीद्वारे येते. अर्थात आगामी काळात स्वत:चे ब्रॅंडेड उत्पादन विकणे जास्त फायद्याचे ठरेल.

सीएलएसई प्रामुख्याने (९० टक्के) बासमती तांदळामध्ये विक्री करते. यामुळे हरियाणा आणि पंजाबमध्ये पुरवठादारांशी कंपनीचे उत्तम व्यावसायिक संबंध प्रस्थापित झाले आहेत. तांदूळ गिरणीसाठी कंपनीचे उत्पादन त्यांच्यावर अवलंबून असल्याने, दर्जेदार निकष राखण्यासाठी पुरवठा करणारे वारंवार बदलले जात नाहीत तसेच पुरवठादारांशी संबंध वर्षभर सोयिस्कर किमतीत तांदूळ खरेदी करण्यास सक्षम करतात.

करोना काळातही कंपनीने उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. सप्टेंबर २०२० साठी संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने विक्रीत ६.११ टक्के वाढ नोंदवून ती १८७.१८ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात तब्बल ८१.५८ टक्के वाढ होऊन तो १६.०७ कोटी रुपयांवर गेला आहे, तर सहामाहीतील नफ्यात १६७.४ टक्के वाढ होऊन तो ४१.०८ कोटीवर गेला आहे. आगामी कालावधीत २०२५ पर्यंत बासमती तांदळाला जागतिक बाजारपेठेत वाढती मागणी अपेक्षित असून कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. एक मध्यम कालीन गुंतवणूक म्हणून या ‘मायक्रो कॅप’चा आपली पोर्टफोलियोसाठी जरूर विचार करा.

आजच्या परिस्थितीत ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेले शेअर्स हे तुम्हाला खालच्या भावात मिळू शकतात. त्यामुळे गुंतवणूक एकाच वेळी न करता टप्प्याटप्प्यात करावी.

चमनलाल सेठिया एक्सपोर्ट लिमिटेड

(बीएसई कोड – ५३०३०७)

शुक्रवारचा बंद भाव : रु. ८७.७०

स्मॉल कॅप

प्रवर्तक : चमनलाल सेठिया

उत्पादन : खाद्य प्रक्रिया- तांदूळ

बाजार भांडवल : रु. ४५४ कोटी

वर्षभरातील उच्चांक/नीचांक : रु. ११४/२४

भागभांडवली भरणा : रु. १०.३५ कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%)

प्रवर्तक ७३.८७

परदेशी गुंतवणूकदार ०.१५

बँक/ म्यु. फंड/ सरकार —

इतर/जनता २५.९९

पुस्तकी मूल्य : रु. ६०.२

दर्शनी मूल्य : रु. २/-

लाभांश : २५%

प्रति समभाग उत्पन्न : रु. १५.११

पी/ई गुणोत्तर : ५.९

समग्र पी/ई गुणोत्तर : १३

डेट इक्विटी गुणोत्तर : ०.१५

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : १८.४

रिटर्न ऑन कॅपिटल : २२.८

बीटा : ०.८

सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

२. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.

THANKS LOKSATTA

Share This Post

Post Comment