|| अजय वाळिंबे
गेली ७५ वर्षे फोसेको ही जागतिक स्तरावरील धातू आणि फौन्ड्री उद्योगाशी संबंधित एक आघाडीची कंपनी आहे. जगभरात ३२ देशांत कंपनीचा वावर असून कंपनीची मुख्य उत्पादन केंद्रे यूएसए, यूके, ब्राझील, चीन, दक्षिण कोरिया, जपान, जर्मनी तसेच भारतात आहेत. एप्रिल २००८ मध्ये फोसेको समूह कूकसन समूह पीएलसीच्या ताब्यात गेला. त्यानंतर २०१२ मध्ये कूकसन समूहाचे डीमर्जर होऊन फोसेको आता वेसुवियस पीएलसी समूहात आहे.
कंपनीने भारतामध्ये सुरुवातीला ग्रीव्हज् कंपनीबरोबर संयुक्त भागीदारी उपक्रमातून ग्रीव्हज् फोसेको लिमिटेड नावाने प्रवेश केला. मात्र १९९४ मध्ये ग्रीव्हज् बाहेर पडल्यावर कंपनीचे नाव बदलून फोसेको इंडिया झाले. भारतामध्ये कंपनीचे पुणे आणि पुड्डूचेरी येथे दोन कारखाने असून फौन्ड्रीला धातूसंबंधित विविध रसायने पुरवणारी ती भारतातील एकमेव कंपनी आहे. अनुभवी प्रवर्तक, विविध उत्पादने, गुणवत्ता आणि उत्पादनातील सातत्य यामुळे कंपनीने कायम उत्तम कामगिरी करून दाखवली आहे. डिसेंबर २०१७ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांकरिता कंपनीने ३५७.६० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३१.३२ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. तर मार्च २०१८ साठी संपणाऱ्या पहिल्या तिमाहीसाठी कंपनीने ९३.६१ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ७.९३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. आगामी कालावधीत ‘मेक इन इंडिया’ तसेच इतर प्रकल्प वाढीस लागण्याची शक्यता आहे. याचा फायदा फोसेकोसारख्या या बहुराष्ट्रीय कंपनीला निश्चित होईल. कंपनीचे भरणा झालेले भागभांडवल केवळ ६.३९ कोटी रुपये असून कंपनीवर कुठलेही कर्ज नाही. सध्या ५२ आठवडय़ाच्या तळाशी बाजारभाव असलेला आणि केवळ ०.४ ‘बीटा’ असलेला हा शेअर दीर्घकालीन सुरक्षित गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो. सध्या शेअर बाजारात मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सची पिटाई चालू असल्याने हाही शेअर तुम्हाला आणखी स्वस्तात मिळू शकतो. त्यामुळे बाजाराचा कल बघून खरेदीचे धोरण ठेवावे.
लोकसत्ता च्या सोवजान्याने