How I Made 2,000,000 in the Stock Market

How I Made 2,000,000 in the Stock Market

सोप्या भाषेत शेअर बाजार (भाग -१३ ) – मितेश ताके

“जिंकायचे कसे?” हे हारनार्याला विचारून उपयोग नसतो. त्यासाठी जिंकणार्याचेच मार्गदर्शन घ्यायला हवे. शेअर बाजारात यश मिळवायचे असेल तर यशस्वी लोकांच्या कथा परत परत वाचा.

माझ्या सुरवातीच्या दिवसात मी निकोलस दर्वास ( Nicolas Darvas ) यांच्या “मी शेअर मार्केट मध्ये २०,००,००० डॉलर कसे कमावले” ( How I Made 2,000,000 in the Stock Market ) या पुस्तकाची पारायणे केली आहेत. सुरवातीला तोटा होऊनही या पुस्तकामुळे माझा उत्साह टिकून राहिला आणि मी प्रगती करू शकलो.

निकोलस (१९२० -१९७७) हा एक नृत्य कलाकार होता. जगभर तो त्याचे कार्यक्रम करत फिरायचा. एका कार्यक्रमाचे पैसे न देता, संयोजकांनी त्या ऐवजी शेअर देऊ केले. त्यावेळी त्या शेअरची किंमत होती ५० पौंड आणि २ महिन्यातच त्याची किंमत झाली १ डॉलर आणि ९० पौंड. म्हणजे तब्बल २८०% वाढ झाली. ती वाढ पाहून निकोलसला शेअर गुंतवणुकीत रस निर्माण झाला. सुरवातील लोक सांगतील ते शेअर तो खरेदी करू लागला. पण तोटाच तोटा झाला. मग एका सल्ले देणाऱ्या कंपनीकडे पैसे भरले, आणि त्यांच्या सल्ल्या नुसार खरेदी विक्री केली तरी तोटाच पदरी पडला. शेवटी त्याने अभ्यास चालू केला. दौरे चालू असताना, प्रवासात तो पुस्तके अभ्यासू लागला. त्याने जवळ जवळ २०० पुस्तके वाचून काढली. काही तर तो परत परत वाचत असे. त्यानुसार प्रयोग चालू केले. अनेक वर्ष अयशस्वी प्रयत्नांनंतर आणि खूप नुकसान सोसल्यावर त्याला एक मेथड सापडली. त्याला त्याने नाव दिले “बॉक्स मेथड”!

जगभर फिरतीवर असताना तो एक मासिक मागवून घेत असे. त्याला ते एक आठवडा उशिरा मिळे. त्यात शेअरची तपशीलवार माहिती असे, त्या माहितीचा उपयोग करून मग ब्रोकरला खरेदी किंवा विक्रीची तार ( टेलेग्राम ) करत असे. या मेथडचा आणि स्टॉपलॉसचा उपयोग करून १९५७-५८ मध्ये १८ महिन्यात त्या काळाचे २० लाख डॉलर कमावले.

यावर टाईम या जगप्रसिध्द मासिकात निकोलसवर मोठा लेख प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे तो आणि त्याची पध्दत जगप्रसिध्द झाली. हा सर्व अनाडी ते लखपतीचा प्रवास त्याने How I Made 2,000,000 in the Stock Market हे पुस्तक लिहून तपशीलवार सांगितला आहे. खरे तर तो त्याच्याच शब्दात वाचायला हवा. त्याची “बॉक्स मेथड” पण त्याने अगदी बारीक सारीक गोष्टींनीशी छान समजावून सांगितली आहे. ज्यांना ट्रेडर बनायचे आहे त्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. इंटरनेटवर पण हे उपलब्ध आहे. शोधल्यास लगेच मिळेल. जरूर वाचा आणि मला प्रतिक्रिया नक्की कळवा.

—————————-

Share This Post

Post Comment